यंदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला येणा-या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्
नेरळ –निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरानच्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी चारचाकी गाडय़ांसह देशी-विदेशी पर्यटक शेकडोंच्या संख्येत माथेरानला भेट देतात. यंदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला येणा-या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे माथेरानमध्ये शुकशुकाट दिसत असून व्यापारी चिंतेत पडले आहेत.
दिवाळीला महिनाभराचा कालावधी उरलेला आहे. या हंगामात माथेरानमधील स्थानिक व्यापारी छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करतात. या बाजारपेठेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, शोभेच्या वस्तू, सुकलेल्या फुलांपासून बनविण्यात आलेले फ्लॉवर पॉट, पर्स, रातकिडय़ासारखे चकाकणारे लाइटिंग आदी वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यटकांची माथेरानच्या बाजारपेठेत गर्दी असते. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये येतात. रिक्षावाले, घोडेवाले, हमालांचा धंदाही तेजीत असतो.
यंदा माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी व उद्योजकांवर मंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. व्यापा-यांनी सांगितले की, माथेरानमधील मनाला भुरळ पाडणारे पॉइंटस् पाहिल्यानंतर पर्यटक तृप्त होतात. तसेच येथील शाल्रेट लेकला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठय़ा संख्येने गर्दी असते.
तलावाच्या पाण्यावर जमा झालेले ढग, वा-याची पाण्याशी सुरूअसलेली स्पर्धा , पाण्यात भिजण्याचा आनंद खासच असतो. तसेच मक्याच्या कणसाचा सुगंध, वडापाव व कांदाभजीच्या वासामुळे पर्यटकांच्या तोंडाला पाणी सुटते. माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास येथील अमन लॉज ते माथेरान दरम्यान करताना अंगावर रोमांच उभे राहतात. सखाराम तुकाराम स्थळाजवळ ही ट्रेन अगदी डोंगराला लागून जाते. पर्यटकांना त्यावेळी दरीचे दर्शन होते. दाट धुक्यातून वाट काढताना नेरळ माथेरान घाट रस्त्याचा तसेच मिनी ट्रेनचा प्रवास पर्यटकांनी माथेरानला भेट दिल्याची पोचपावती असते . मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत दिवाळी हंगामात असल्याने वातावरणाकडे पर्यटक पाठ फिरवीत आहेत. त्यामुळे उद्योगधंदे मंदीत असल्याने व्यापारीवर्ग चिंतातूर झाला आहे .