नाताळनिमित्त माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. येथील सर्वच हॉटेल्स, विश्रामगृहे ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. दस्तुरीनाक्याजवळचा वाहनतळ वाहनांनी भरून गेला आहे.
माथेरान – नाताळनिमित्त माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. येथील सर्वच हॉटेल्स, विश्रामगृहे ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. दस्तुरीनाक्याजवळचा वाहनतळ वाहनांनी भरून गेला आहे. नाताळनिमित्त माथेरानमध्ये विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
नाताळ सण साजरा करण्याठी दरवर्षी पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. नाताळच्या चारपाच दिवस आधीच या भागातील विश्रामगृहांची नोंदणी पूर्ण झालेली असते. त्यातच यंदा अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू झाल्यामुळे ही गर्दी जास्तच वाढली आहे. कर्जत-माथेरान-दस्तुरी नाका ही एसटी महामंडळाची सेवाही सुरू आहे. येथील सर्वच हॉटेल्समध्ये नाताळनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
या सर्व भागातच १०० हून अधिक कर्मचारी वेळोवेळी परिसराची स्वच्छता करण्यात गुंतले आहेत. पाणीपुरवठा प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनी सेवा सुरळीत राहावी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस सतर्क झाले आहेत.
अलिबाग, मुरुडमध्ये झुंबड
अलिबाग – नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अलिबाग, मुरुड मध्ये पर्यटकांची झुंबड उडाली आहे. सद्या येथे फेस्टिवल आणि यात्रांचे दिवस आहेत. त्यातच विविध ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने पर्यटकांनी रविवारपासूनच येथे हजेरी लावली आहे. किहीम, नागाव, अलिबाग, काशिद आणि मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
मुरुड नगर पालिकेकडून दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित केला जातो. शतकोत्तर हीरक वर्षात पदार्पण करणा-या मुरुड नगर पालिकेने यावर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समुद्रकिनारी पर्यटकांसाठी विविध स्थानिक चवीच्या खाद्यपदार्थाचे ४० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर कबड्डीस्पर्धा, विविध करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. समुद्रस्नानासाठी प्रसिद्ध असलेल्या काशिद समुद्रकिनारीही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी या ठिकाणी साधारण एक हजार पर्यटकांची वाहने होती.
‘अंनिस’चा व्यसनमुक्ती सप्ताह
‘खाऊ नका गुटका, पिऊ नका दारू’ असे म्हणत व्यसन मुक्त निरोगी समाज निर्मितीसाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना साथ द्या, असे आवाहन ‘अनिस’ चे रायगड जिल्हाध्यक्ष नितीनकुमार राऊत यांनी केले आहे. सरखेल कान्होजी आंग्रे विद्यालय चिखली येथे २२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. अनिसतर्फे ३१ डिसेंबपर्यंत व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
मद्यपींचीही चंगळ
नाताळ निमित्ताने यंदा २४,२५ तारीख आणि वर्षाअखेर निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी मद्यगृहे पहाटे पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. या दिवसात मद्य पिण्याचा एक दिवसाचा परवानाही बार, हॉटेलमध्ये देण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांची जादा कुमक
गर्दीला आणि अतिउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे मात्र पोलिसांना कठीण जात आहे. यासाठी मुरुड पोलिस ठाण्याची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. जीवरक्षक दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दरम्यानच चौल येथील दत्ताची यात्रा येत आहे. त्यामुळे ही गर्दी वर्षाअखेपर्यंत कायम राहील असा अंदाज येथील व्यावसायिकांचा आहे. खारेपाट महोत्सवाचीही रंगत वाढत असून हा महोत्सवही अखेरच्या टप्प्यात आहे. या महोत्सवातही पर्यटकांची हजेरी जास्त होती. विविध स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे अलिबाग मुरुडकडे जाणारे पर्यटकही या महोत्सवाकडे आकर्षित झाले आहेत.