पर्यटकांना माथेरान या शहराची माहिती व्हावी, म्हणून लावण्यात आलेल्या सूचना फलकांवर सूचना अथवा दिशादर्शक लावलेले नसून त्या फलकांची दुरवस्था झाली आहे.
माथेरान – जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये येणारे पर्यटक मोठय़ा संख्येने खासगी वाहनांनी येतात. पर्यटकांना माथेरान या शहराची माहिती व्हावी, म्हणून लावण्यात आलेल्या सूचना फलकांवर सूचना अथवा दिशादर्शक लावलेले नसून त्या फलकांची दुरवस्था झाली आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असतानाही माथेरान गिरीस्थान नगरपालिका या फलकांची दुरुस्ती कधी करणार, असा प्रश्न येथील व्यावसायिक, अश्वचालक, हातरिक्षाचालक व मजूर यांना पडला आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येण्यासाठी पर्यटकांना दोन मार्ग आहेत. काही पर्यटक नेरळ-माथेरान मिनीट्रेनने तर काही नेरळ-माथेरान घाटरस्त्याने येतात. यातील नेरळ-माथेरान मिनीट्रेनने आलेले पर्यटक थेट माथेरान शहरात पोहोचतात. तर दुसरीकडे घाटरस्त्यावरून वाहनाने आलेल्या पर्यटकांना दस्तुरी नाका येथे माथेरानमध्ये जाण्यासाठी दुस-या वाहनाने जावे लागते. यासाठी घोडे, हातरिक्षा अथवा मिनीट्रेनच्या शटल गाडीतून किंवा चालत माथेरानला जावे लागते. या सर्व पर्यटकांसाठी माथेरान शहर, माथेरान बाजारपेठ यांची माहिती देणारे चार लोखंडी बोर्ड घोडा स्टॅण्डजवळ माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने लावले होते. त्या फलकांवर दरवर्षी नव्याने सूचना फलक अथवा दिशादर्शक लावणे आवश्यक आहे. मात्र पावसाळ्यात हे फलक भिजल्यामुळे त्यावर लावलेले सर्व दिशादर्शक, सूचनाफलक दिसेनासे झाले आहेत. सध्या पावसाळा संपला तरी या फलकांवर कोणतीही सूचना, दिशादर्शक लावलेले नाहीत.
दिवाळीपासून माथेरानचा पर्यटक हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील चार सूचना फलकांची रंगरंगोटी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने का केली नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तसेच माथेरानचे संपूर्ण जनजीवन ज्या पर्यटनावर अवलंबून आहे, पर्यटनासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिका सूचना फलक व दिशादर्शकांची रंगरंगोटीदेखील करू शकत नाही. तसेच पुढील महिन्यात येणा-या नाताळच्या निमित्तानेही अनेक पर्यटक येथे येतात. तेव्हा सध्याचा पर्यटनाचा हंगाम सुरू असताना माथेरानमधील नगरपालिकेने लावलेले हे चारही फलक सूचना व दिशादर्शकांनी सजतील अशी मागणी येथील व्यावसायिक, अश्वचालक, हातरिक्षाचालक व मजूर करत आहेत.