दोन वर्षापासून वनविभागाने घातलेल्या निर्बंधांमुळे व्हॅली क्रासिंगचा व्यवसाय बंद आहे. परिणामी या ६७ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
माथेरान- माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांसाठी येथील बेरोजगार तरुणांनी व्हॅली क्रासिंगचा खेळ सुरू केला होता. माथेरानच्या बहुतेक सर्व प्रेक्षणिय स्थळांवर व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार पर्यटक अनुभवत होते. या माध्यमातून माथेरान आणि बाहेरील ६७ कुटुंबे उदरनिर्वाह करत होती. मात्र दोन वर्षापासून वनविभागाने घातलेल्या निर्बंधांमुळे हा व्यवसाय बंद आहे. परिणामी या ६७ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
माथेरानच्या जंगलात असलेल्या शार्लेट लेक परिसरात एका पदवीधर सुशिक्षित बेरोजगार तरुणाने प्रशिक्षण घेऊन सर्वप्रथम पर्यटकांसाठी व्हॅली क्रॉसिंगचा हा खेळ उपलब्ध करून दिला होता. त्या वेळी व्हॅली क्रॉसिंग एका खड्डय़ापुरता मर्यादित होती. माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांनी या खेळाला दिलेली पसंती लक्षात घेऊन, माथेरानमधील अन्य बेरोजगार तरुणही या व्यवसायात उतरले. त्यांनीही वनविभागाच्या संरक्षित जमिनीवर खड्डे खोदले. सिमेंटचे बेकायदा बांधकाम केले. तसेच झाडांना लोखंडी तारांचे गळफास लावले. मात्र पर्यावरणप्रमींनी आवाज उठवल्याने वनविभागला कारवाई करावी लागली. तेव्हापासून हा व्यवसाय बंद आहे.
माथेरानच्या जंगलात विविध ३५ ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्हॅली क्रासिंगवर ६७ कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र बंद झालेला हा व्हॅली क्रॉसिंगचा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, यासाठी येथील बेरोजगार तरुण नगर परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिका-यांचे उंबरे झिजवत आहेत. माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाची गरज असून, तशी परवानगी मिळाल्यास या तरुणांसोबतच पर्यटकांचाही आनंद द्विगुणित होणार आहे.