माथेरानमध्ये असलेल्या ‘लुईझा पॉइंट’ या प्रेक्षणीय स्थळाला मोठया संख्येने पर्यटक भेट देतात.
माथेरान- माथेरानमध्ये असलेल्या ‘लुईझा पॉइंट’ या प्रेक्षणीय स्थळाला मोठया संख्येने पर्यटक भेट देतात. लोकवस्तीपासून दूर असलेल्या या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जंगलाचा -हास होऊ नये, यासाठी एक सुरक्षा चौकी उभारण्यात आली होती. मात्र, वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या या चौकीची दुरवस्था झाली आहे.
माथेरानला पर्यटनासाठी येणारे पर्यटक लुईझा पॉइंटला हमखास भेट देतात. या ठिकाणावरून निसर्गाचे विहंगम दृश्य पाहता येते. त्यामुळे पर्यटनाच्या हंगामात शेकडोच्या संख्येने पर्यटक येथे येतात. या स्थळाची भौगोलिक रचना पाहता असलेला धोका लक्षात घेऊन वन विभागाने येथे सुरक्षा चौकी बांधली होती. कोणताही पर्यटक दरीच्या कडेला जाऊ नये आणि येथील वनसंपदेचा -हास होऊ नये, याची खबरदारी चौकीतील वन कर्मचारी घेत होते. मात्र मागील काही वर्षात वन कर्मचा-यांचे लुईझा पॉइंटवरील चौकीकडे फिरकणे कमी झाले आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मोडकळीस आलेल्या चौकीचा फक्त चौथरा दिसत आहे.
दरम्यान, वन कर्मचारी येथे फिरकत नसल्याने परिसरात वृक्षतोड आणि अन्य गैरप्रकारांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. तर, अशा गैरप्रकार व प्रवृत्तींना रोखण्याची जबाबदारी वन विभागाची असताना संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून केवळ लुईझा पॉइंटला लोखंडी कडे घालून हात वर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही वर्षात लुईझा पॉइंटला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे आता येथे सुरक्षा चौकी नसली तरी चालेल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आम्ही दरीच्या कडेला लोखंडी कडे उभारले आहे.- बी. एस. कांबळे, वनपाल, माथेरान