नेरळहून माथेरानपर्यंत धुरांच्या रेषा हवेत काढत जाणा-या ‘टॉय ट्रेन’ला वाफेचे इंजिन बसवण्यास वनखात्याने आक्षेप घेतला आहे.
मुंबई – नेरळहून माथेरानपर्यंत धुरांच्या रेषा हवेत काढत जाणा-या ‘टॉय ट्रेन’ला वाफेचे इंजिन बसवण्यास वनखात्याने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे माथेरानच्या राणीची झुकझुक कायमची बंद होणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनीदेखील टॉय ट्रेनला वाफेचे इंजिन बसवू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे टॉय ट्रेनला इंजिन लावण्यासाठी कायमचा ‘ब्रेक’ बसला आहे.
माथेरानच्या राणीला वाफेचे इंजिन बसवून ती चालवण्याचा प्रयत्न मागील सलग दोन वर्षे झाला. मात्र ही झुकझुक गाडी नेरळ सोडून घाटमाथा गाठत असतानाच रेल्वेमार्गालगत असलेल्या पालापाचोळय़ाने अचानक पेट घेतल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. त्यावेळी सुदैवाने आगीचा भडका उडाली नाही म्हणून मोठा अनर्थ टळला. वनखात्याने याची गंभीर दखल घेत या गाडीला इंजिन बसवण्यास रेल्वेला मनाई केली. यंदा जानेवारीतही टॉय ट्रेनला पुन्हा इंजिन बसवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाही असाच प्रसंग ओढवल्याने वनखात्याने रेल्वे अधिका-यांना नोटीस बजावून वाफेचे इंजिन लावू नये, अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे यापुढे टॉय ट्रेनची झुकझुक कायमची बंद राहणार आहे. झुकझुक गाडीला बसवण्यात आलेली वाफेची दोन इंजिन आता नेरळ स्थानकात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
‘झुकझुक गाडी पुन्हा सुरू करा’
वाफेच्या इंजिनातून बाहेर पडणा-या ठिणग्या थांबवण्यासाठी संरक्षक जाळ्या बसवून ‘टॉय ट्रेन’ चालवल्यास पर्यटकांना त्याचे आकर्षण असेल. माथेरानकडे पर्यटकांचा ओढाही वाढेल. त्यामुळे मध्य रेल्वेने ‘झुकझुक’ गाडी पुन्हा सुरू करावी, असे मत माथेरान विकास आघाडीचे नगरसेवक संतोष पवार यांनी ‘प्रहार’कडे व्यक्त केले.
दार्जिलिंग मार्गावरील ‘झुकझुक’ गाडी बनावट
दार्जिलिंग मार्गावर धावणारी ‘झुकझुक’गाडी प्रत्यक्षात डिझेल इंजिन लावूनच चालवली जात आहे. पण त्याचे डिझाइन ‘झुकझुक’गाडीसारखे केले आहे. इंजिनच्या टोकाशी असलेल्या धुराडय़ातून बाहेर पडणारा धूर हा कोळशाचा नसून डिझेलचा असतो, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
इंजिनातील वाफेच्या प्रचंड दाबाची तांत्रिक पाहणी करण्यासाठी यापूर्वी रेल्वेकडे ‘बॉयलर निरीक्षक’ होते. ही पाहणी केल्यावर त्यासंबधीचे प्रमाणपत्र मिळाल्यावरच नेरळ ते माथेरानपर्यंत ही गाडी चालवली जात असे. मात्र हे पद आता नसल्याने या मार्गावर वाफेचे इंजिन चालवणे अतिधोकादायक ठरू शकते. यापूर्वी दोनदा वाफेचे इंजिन लावून ही गाडी चालवण्याचा प्रयत्न झाला. पण तो फसल्याने यापुढे ‘झुकझुक गाडी’ चालवू नये, असे आदेश संबंधित अधिका-यांना दिले आहेत. – सुबोध जैन, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक
[EPSB]
माथेरानची राणी अखेर धावली!
हिरवाईने शालू पांघरलेल्या माथेरानच्या डोंगरद-यांतून अखेर माथेरान मिनीट्रेनची झुकझुक सुरू झाली आहे.
[/EPSB]