नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीत लपलेले धबधबे, हिरवीगार झाडी, डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी अशा अनेक निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानला जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा लाभला आहे.
नेरळ – नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीत लपलेले धबधबे, हिरवीगार झाडी, डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी अशा अनेक निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानला जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे देशभरातून तसेच विदेशातून शेकडो पर्यटक माथेरानच्या निसर्गसौंदर्यात रमण्यासाठी येतात.
उन्हाळी तसेच हिवाळी हंगामात पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन म्हणजेच माथेरानच्या राणीचा प्रवास करावा लागतो, मात्र मागील काही दिवसांपासून माथेरानच्या राणीच्या डिझेल इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
या समस्येमुळे पर्यटकांना खासगी वाहनाने जादाचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांनी माथेरान रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, माथेरानची राणी प्रवासासाठी परत कधी येणार, असा आशा-अपेक्षांचा सूर पर्यटकांतून
येत आहे.
मागील महिन्यात २७ फेब्रुवारीला नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या व्हिल गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्या दिवशी पर्यटकांना जुम्मापट्टी येथून नेरळ रेल्वे स्थानकापर्यंत चालत जावे लागले. पर्यटकांना होणारा नाहक त्रास दूर व्हावा, यासाठी माथेरान रेल्वे प्रशासनाने कोणतीही सकारात्मक पावले उचलली नाहीत.
नेरळ लोको शेडमध्ये मिनी ट्रेनसाठी सहा डिझेल इंजिन कार्यरत आहेत, मात्र यापैकी चार डिझेल इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या इंजिनला दुरुस्तीसाठी परेल येथील वर्कशॉपमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच दोन डिझेल इंजिन अमन लॉज ते माथेरान या फेऱ्यांसाठी कार्यरत आहेत. अमन लॉज ते माथेरान मिनी शटल सेवेच्या चौदा फे-या होतात. तर नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सकाळी ६.३०, ७.५०, ९.२०, १०.३० आणि सायंकाळी ५.१० अशा एकूण पाच फे-या होतात.
मिनी ट्रेनच्या तांत्रिक बिघाडाविषयी नेरळ लोको शेडचे वरिष्ठ विभागीय अभियंता जे. सी. वर्मा यांनी सांगितले की, पावसाळी हंगामामुळे तसेच शटल सेवेमुळे मिनी ट्रेनच्या डिझेल इंजिनची सतत दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला जादाचा कालावधी मिळत नाही. तसेच माथेरानला जाण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. मिनी ट्रेनच्या फे-या वाढवण्यासाठी सहा डिझेल इंजिन अपुरी पडतात. पर्यटकांना सुखरूप प्रवास करता यावा, यासाठी जादाचे चार डिझेल इंजिन लोकोशेडमध्ये कार्यरत असणे गरजेचे आहे. ११ मार्चला नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत सज्ज होण्याची शक्यता आहे.