रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये मिनी ट्रेनला अमन लॉज स्टेशनजवळ अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माथेरान- रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये मिनी ट्रेनला अमन लॉज स्टेशनजवळ अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माथेरान स्थानकातून दुपारी ३:२० वाजता नेरळकरता सुटलेली मिनी ट्रेन गाडी ६ डब्यांमध्ये १५६ प्रवासी घेऊन नेरळकडे जात असताना साडेतीन वाजता अमन लॉज स्टेशनपासून ४० फूट अंतरावर आली असताना अचानक गाडीच्या एका बोगीची चाके निखळली व रुळापासून दूर फेकली गेली. या बोगीत ३० प्रवासी होते. त्यामुळे प्रवासी घाबरले.
या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. हा अपघात बोगीचा एक्सेल तुटल्यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनाचे अमन लॉज स्टेशनमास्तर वर्मा यांनी केला. मिनी ट्रेनचे प्रवासी डबे यापूर्वी अनेकदा रुळावरून खाली उतरले आहेत. परंतु एक पूर्ण प्रवासी डबा घसरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.