जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून दर्जा लाभलेल्या माथेरानमधील जुन्या रस्त्यांवरून उडणा-या धुळीमुळे नागरिकांच्या तसेच पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
नेरळ – जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून दर्जा लाभलेल्या माथेरानमधील जुन्या रस्त्यांवरून उडणा-या धुळीमुळे नागरिकांच्या तसेच पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून कोटय़वधी रुपये खर्च करून नवीन रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता माथेरानकरांच्या डोळ्यात केवळ धूळफेक केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
माथेरानमध्ये येणारा पूर्वीचा रस्ता मातीचा असल्याने मोठय़ा प्रमाणात धूळ उडत होती. यावर उपाय म्हणून पर्यटन विभागाने नवीन रस्ता बनवण्यासाठी निधी मिळवला होता. या निधीतून रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे निश्चित करण्यात आले, मात्र पेव्हर ब्लॉक बसवल्यास या रस्त्यावरून घोडय़ांचे पाय घसरू शकतात, या भीतीने अश्वपाल संघटनेने हे पेव्हर ब्लॉक बसवण्यास विरोध केला होता. त्यात भर म्हणून मॉनिटरिंग कमिटीनेही या कामाला लाल कंदील दाखवला.
दरम्यान, कंत्राटदाराने त्याच निधीच्या माध्यमातून लाल माती आणि दगड टाकून हा रस्ता बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या पावसात या रस्त्यात अत्यंत दलदल झाली होती. साहजिकच या रस्त्यावरून पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना चालणे अत्यंत गरसोयीचे बनले आहे. या रस्त्यावर नाहक कोटय़वधी रुपये खर्च करणे म्हणजे माथेरानकरांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखेच असल्याचे मत माथेरानकरांनी व्यक्त केले आहे