पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी प्रवाहित होणा-या धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्यासाठी तरुण-तरुणींकडून पावसाळी सहलींचे प्लॅन आखले जातात.
माणगाव – पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी प्रवाहित होणा-या धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्यासाठी तरुण-तरुणींकडून पावसाळी सहलींचे प्लॅन आखले जातात. या तरुण-तरुणींचे हक्काचे ठिकाण म्हणजे माणगाव-पुणे रस्त्यावरील ताम्हीणी घाटातील निरनिराळे शुभ्र धबधबे.
डोंगराळ भागातील फेसाळ धबधबे पाहून त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी येथे पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. शनिवार-रविवारी तर येथे गर्दीला उधाण आलेले असते.
दाट धुके, मुसळधार पाऊस, निरव शांतता, अंगाला झोंबणारा गार-गार वारा, डोंगर द-या व कडया कपारीतून कोसळणारे धबधबे आणि नागमोडी वळण वाटांचा रस्ता हे पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे पाऊस सुरू झाला की ताम्हीणी घाट पर्यटकांना खुणावू लागतो. या घाटातून खाली नजर टाकल्यास हिरवा शालू नेसल्यासारखी दिसणारी शेतीव वनराईने अतिशय विलोभनीय दृश्य मन हरवून टाकते.