विद्युत वेगाने शत्रूच्या हद्दीत घुसून बॉम्बफेक करणा-या अत्यंत खडतर अशा लढाऊ वैमानिकांचे आकाश आता महिलांना खुले झाले आहे.
नवी दिल्ली – विद्युत वेगाने शत्रूच्या हद्दीत घुसून बॉम्बफेक करणा-या अत्यंत खडतर अशा लढाऊ वैमानिकांचे आकाश आता महिलांना खुले झाले आहे.
आतापर्यंत हेलिकॉप्टर व मालवाहतूक विमाने चालवणा-या महिलांना आता लढाऊ विमानाचे खडतर आव्हान पेलावे लागणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय संरक्षण खात्याने शनिवारी केली.
भारतीय हवाई दलाच्या प्रबोधिनीत सध्या विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेणा-या तुकडीतून लढाऊ विमान चालवण्यासाठी महिला वैमानिकांची पहिली तुकडी निवडली जाईल, असे खात्याने जाहीर केले.
८ ऑक्टोबर रोजी झालेल्या हवाई दलाच्या वर्धापन दिन सोहळ्यात हवाई दलप्रमुख अरूप राहा यांनी महिलांना लढाऊ विमानाची कमान सांभाळण्यास देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत या घोषणेची अंमलबजावणी झाली आहे.
या महिला वैमानिकांना लढाऊ विमान चालवण्याचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर २०१७ मध्ये महिला वैमानिकांची पहिली तुकडी लढाऊ विमान चालवण्यासाठी सज्ज होईल.
भारतीय हवाई दलातील महिला वैमानिक सध्या मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर चालवतात. हवाई दलाचे हे पाऊल म्हणजे सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या समान अधिकारांसाठी लढा देणा-यासाठी एक विजय आहे.
सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या एका महिलेची वैमानिक म्हणून निवड करण्यात येईल. तिचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला जून २०१६ मध्ये लढाऊ विमान चालवण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिल्यानंतर जून २०१७ मध्ये तिला लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात घेतले जाईल.
सध्या लष्करात सिग्नल्स, अभियंते, लष्करी हवाई दल, इलेक्ट्रॉनिक्स व मॅकेनिकल्स, लष्करी सेवा कॉर्प, गुप्तचर विभाग, आदींमध्ये महिला काम करत आहेत. नौदलातही वकील, न्यायाधीश, प्रशिक्षक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. टेहळणी विमानांमध्ये महिला वैमानिकांना नेमण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हवाई दलात १५०० महिला असून त्यात ९४ वैमानिक व १४ दिशादर्शक म्हणून काम करतात.