मुंबई विमानतळावर आता महिला टॅक्सी चालकांसाठी खास जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.
मुंबई – मुंबई विमानतळावर आता महिला टॅक्सी चालकांसाठी खास जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. खुद्द मुंबई विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती उच्च न्यायालयाला दिली. मुंबई विमानतळावर टॅक्सी सेवा पुरवणा-या श्री शक्ती केंद्र या संघटनेसोबत चर्चा करून विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांच्यासमोर शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली. महिला टॅक्सीचालकांना विमानतळावर मुबलक जागा मिळावी, यासाठी श्री शक्ती केंद्राच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर विमानतळ प्राधिकरण व संघटनेने सामोपचाराने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाकडून देण्यात आला होता. महिला टॅक्सीचालक असल्याने मध्यरात्री बाहेरून परतणा-या महिला प्रवाशांना सुरक्षितता मिळेल, असा संदर्भ न्यायालयाने दिला होता.
विमानतळातील पार्किंगच्या जागी महिला आणि पुरुष चालक दोघांनाही एकत्रितपणे प्री-पेड काउंटरने जागा उपलब्ध होणार आहे. मात्र महिला टॅक्सीचालकांना सुरक्षा पुरवणे आपली जबाबदारी राहणार नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
मात्र वातानुकूलित टॅक्सींसाठी पाच ठिकाणे आरक्षित असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. हे संपूर्ण व्यवस्थापन पुढील सुनावणीत व्हायला हवे, असे निर्देश दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी होणार आहे.