मध्य रेल्वेने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा महिला दिनी केली होती.
मुंबई- महिलांची सुरक्षाव्यवस्था प्रबळ करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा महिला दिनी केली होती. मात्र, ही घोषणादेखील हवेतच विरली आहे.
१५ एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार होते. त्यासाठी इटालियन कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, खर्च वाढल्याने ही योजना बारगळली असल्याची माहिती रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिका-याने दिली आहे.
महिलांच्या डब्यात १५ एप्रिलपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी केली होती. मात्र, ही तारीख उलटल्यानंतरही महिलांच्या एकाही डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. मध्य रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कंत्राट एका इटालियन कंपनीला दिले होते.
ही कंपनी एका गाडीत दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि गार्डजवळ एक एलइडी मॉनिटर बसवणार होती. या कामासाठी कंपनीने २० लाख रुपयांच्या खर्चाची निविदा भरली होती. मात्र, आता कंपनीने ही रक्कम एक कोटीच्या वर जाणार असल्याचे मध्य रेल्वेला सांगितले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन आणि इटालियन कंपनी यांच्यात वाद निर्माण झाला असून, त्यात ही योजना अडकली आहे. जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत मात्र महिलांना सीसीटीव्ही कॅमे-यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.