मुरूड तालुक्यातील महाळुंगे येथे मुलीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
अलिबाग- मुरूड तालुक्यातील महाळुंगे येथे मुलीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत. हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. संदीप कृष्णा वाघमारे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
२० जुलै रोजी सायंकाळी महाळुंगे गावातील काही मुली गावाशेजारीच असलेल्या शाळेजवळ फिरायला गेल्या होत्या. त्याचवेळी झुडपात लपलेल्या काही जणांनी बंदुकीतून त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात पूजा विलास पालवणकर व सायली प्रकाश रातवडकर या दोन मुली जखमी झाल्या. त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
जंगल भागात दडून बसलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ४ ते ५ पथके, शीघ्र कृती दलाचे जवान काम करत होते. आरोपी फणसाड अभयारण्य परिसरात दडून बसले असल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, ते वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होते.
शनिवारी सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह शीघ्र कृती दलाचे उपनिरीक्षक सांगवीकर व पाच जवान तसेच उपनिरीक्षक आनंदराव मुळीक, महेश लांगी, संजय जगताप, सुदेश मारकंडे, धम्रेद म्हात्रे, भाग्यवान कांबळे, संतोष पवार, आदी पोलीस कर्मचा-यांनी फणसाड अभयारण्याकडे कूच केले.
जवळजवळ पंधरा कि.मी. जंगल भाग तुडवत फणसाड डोंगरभागातून तपास पथक सुपेगावला पोहोचले. चोरढे जंगल भागात असलेल्या झोपडीत लपलेल्या संदीप वाघमारेला पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचा सहकारी सहदेव ठाकूर हा बाहेर असल्याने पोलिसांच्या हाती लागला नाही.
बाराशे रुपयांसाठी हल्ला
या हल्ल्यात जखमी झालेली सायली हिचे वडील प्रकाश रातवडकर यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. संदीप वाघमारे व त्याचा साथीदार महेंद्र पवार यांना पैसे देऊन त्यांच्याकडून वीट्टभट्टीसाठी लाकडे घेतली जात होती. या व्यवहारातील बाराशे रुपये संदीपकडून येणे बाकी होते. तर महेंद्र पवार यांच्याकडून काही रक्कम येणे आहे. त्यावरून प्रकाश रातवडकर यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. या रागातून आरोपींनी या मुलींवर गोळीबार केला व पळून गेले.