मुंबईसह महाराष्ट्रात कॅरमचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने (एमसीए) कंबर कसली असून हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य पुढील वर्षी (२०१४) विविध स्पर्धा आयोजित करण्याचे तसेच उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
मुंबई – मुंबईसह महाराष्ट्रात कॅरमचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने (एमसीए) कंबर कसली असून हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य पुढील वर्षी (२०१४) विविध स्पर्धा आयोजित करण्याचे तसेच उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शिवकुमार लाड आणि मानद सचिव अरुण केदार यांनी ही माहिती दिली.
हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे संकेतस्थळ (वेबसाइट) आणि कॅरमपटूंचे छायाचित्र असेलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम २६ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे होतील. वेबसाइट काढणारी महाराष्ट्रातील पहिली कॅरम असोसिएशन आहे.
या स्तुत्य उपक्रमांसह जानेवारीत सहावी शिवाजी पार्क जिमखाना गुणांकन कॅरम स्पर्धा, फेबुवारी राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्चला महिलांसाठी राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा, जूनमध्ये तिसरी स्वामी विवेकानंद राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा, सप्टेंबरमध्ये ५०वी सब-ज्युनियर महाराष्ट्र राच्य कॅरम (नांदेड) तसेच त्याच महिन्यात जळगावमध्ये ५०व्या ज्युनियर महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये विरारमध्ये पुन्हा राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा रंगेल. राज्यस्तरीय स्पर्धासह मे महिन्यात काही जिल्हय़ांत प्रशिक्षण शिबिरे राबवण्याचा तसेच डोंबिवली आणि ठाण्यात पंचांची कार्यशाळा राबवण्याचा असोसिएशनचा मानस आहे. जुलैमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी तसेच आंतरशालेय, आंतरकॉलेज, आंतरकार्यालय तसेच आंतरसरकारी कार्यालय कॅरम स्पर्धा तसेच शारीरिकदृष्टय़ा अपंग कॅरमपटूंसाठीही स्पर्धा घेतली जाणार आहे.
कॅरम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कॅरमपटू, पंच तसेच कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार तसेच ‘रन फॉर स्पोर्ट्स आणि रन फॉर कॅरम’ रॅली अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही कॅरम असोसिएशनतर्फे केले जाणार आहे.