देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी भर देणार असल्याचे सांगत महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.
शिर्डी – देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी भर देणार असल्याचे सांगत महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमांचे उद्घाटन तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभू म्हणाले की, प्रवाशांना स्वस्तात पिण्याचे पाणी, रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशभरातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. त्यांच्यासाठी विविध सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. जीवनामध्ये चार धाम यात्रा यशस्वी व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते यासंदर्भातही रेल्वेने सर्वेक्षण सुरु केले असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
रेल्वेच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असल्याचे सांगत रेल्वे विभागात आलेल्या प्रत्येक पत्र, निवेदनाची दखल घेतली जाते. जे काम होण्यासारखे आहे ते तात्काळ मार्गी लावले जाते तर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गतीने प्रयत्न केले जातात. यावर्षी ८१० कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला आहे. एका दिवसाला अडीच ते तीन कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने सोयीसुविधांच्या वाढीवरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीच्या शुभारंभासह पादचारी पूल, फलाट क्रमांक २, वॉटर वेडिंग मशिन, स्थानकांना जोडणा-या रस्त्यात सुधारणा, साईनगर शिर्डी आणि सोलापूर विभागातील इतर मोठ्या स्थानकावर रोकड रहित कामकाज, सोलापूर विभागातील महत्वाच्या स्थानकावरील २० वॉटर वेंडिंग मशिनचे लोकार्पण तसेच साईनगर शिर्डी स्थानकावरील प्रवासी सुविधा कामांचा शुभारंभ करण्यात आला.