भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ११ ते १४ एप्रिल २०१६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ११ ते १४ एप्रिल २०१६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत महापौर सुधाकर सोनवणे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त शहर आयुक्त अंकुश चव्हाण, समाज विकास विभागाच्या प्र. उपआयुक्त संध्या अंबादे आदी उपस्थित होते.
वाशी सेक्टर ३० येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ४ दिवस होणा-या या जयंती सोहळ्याचे उद्घाटन महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी महापौर सोनवणे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्तदिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, परिवहन सभापती साबू डॅनिअल आणि इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दुपारी १ वाजता दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलींद कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलूंबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर खादी ग्रामोद्योगचे माजी व्यवस्थापकीय संचालक के. डी. कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि उद्योगविचार या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
दुपारी तीन वाजता महात्मा जोतिबा फुले यांचे शिल्प व चित्र प्रात्यक्षिक नामवंत चित्रकार व शिल्पकार साकारणार आहेत. सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘द ट्र सन ऑफ इंडिया’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
१२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे चित्र व शिल्प सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकारांकडून साकारण्यात येणार आहे.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर गायकवाड हे बाबासाहेबांच्या जीवनावर तसेच केईएम रुग्णालयाचे पी.एस.एम विभागप्रमुख डॉ. आर. आर. शिंदे आरोग्य विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायं सहा वाजता वेध थिएटर निर्मित ऐतिहासिक महानाटय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक सादर होणार आहे.
१३ एप्रिल रोजी सकाळी १० पासून संत गाडगेबाबा यांचे चित्र व शिल्प नामवंत चित्रकार व शिल्पकारांकडून साकारण्यात येणार असून सकाळी ११ वाजता धम्मचारी मैत्रेयनाथ यांचे व्याख्यान तसेच चित्रकार नामानंद मोडक यांचे ‘बुद्ध धम्मातील कलेचे महत्त्व’ विषयावर व्याख्यान होणार आहे.
दुपारी १ वाजता इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत’ याविषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. तर जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या पोलीस बँड पथकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बँड वादनातून मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ‘कबीर शाक्य आणि समूहजागर समतेचा, एक सांस्कृतिक प्रवास’ हा बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावरील गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच न्यायाधीश डॉ. यशवंत चौरे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी एक वाजता कार्यगौरव व कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.