भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.
कल्याण/महाड- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी भव्य कृतज्ञता अभिवादन रॅली काढण्यात आली. महापालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘सिंबॉल ऑफ नॉलेज’ असलेल्या चित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महापालिका मुख्यालयातून रॅलीचा प्रारंभ झाला.
यानंतर अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक, गुरुदेव हॉटेल, दीपक हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, बॅण्डपथक, चित्ररथ आणि बग्गीचा समावेश करण्यात आला होता. बग्गीतील डॉ. बाबासाहेबांची भूमिका साकारणारे भिवंडी महापालिकेचे उपायुक्त सुनील भालेराव हे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, उपायुक्त दीपक पाटील, सुरेश पवार, सुनील लहाने आणि बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ उपस्थित होते.
तर महाडमध्येही बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने महाड दणाणून गेले होते. तर दुपारी चवदार तळे येथील बाबासाहेबांच्या पुतळयावर फाईट फॉर राईट या संस्थेकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मागील अनेक वर्षापासून तालुका पातळीवर एकच जयंती उत्सव आयोजित केला जातो.
यावेळी तालुक्यातील गावागावांतून आलेले आखाडे मिरवणूक काढतात. गुरुवारी चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयासमोर नतमस्तक होण्यासाठी माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष सुनील कविसकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, जिल्हा परिषद सदस्य बाळ राऊळ, महाड तहसीलदार संदीप कदम, गटविकास अधिकारी संघरत्ना खिल्लारे, दलित मित्र मधुकर गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, लक्ष्मण जाधव, प्रभाकर खांबे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ शिर्के, तुळशीराम जाधव, केशव हाटे, सखाराम सकपाळ, विश्वनाथ सोनावणे, सज्जन पवार, मुकुंद पाटणे आदी नेते उपस्थित होते.