अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक तरुण पुढे येत असतात, आपल्या कलागुणांना चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात आणखी बदल करत पुढे जातात.
अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक तरुण पुढे येत असतात, आपल्या कलागुणांना चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात आणखी बदल करत पुढे जातात. असाच आमचा एक ग्रुप म्हणजे परळचा महाबली पुणेरी ढोल पथक. सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरी गणपतीच्या काळात आरती करण्यासाठी आम्हाला बोलावलं जायचं.
त्यावेळी आमचं फक्त भजनी मंडळ होतं. गेली १२ वर्ष या आरतीसाठी सलमान खान आम्हाला स्पॉन्सर करतो. परंतु आमच्या ग्रुपच्या मुलांना आणखी काहीतरी करण्याची इच्छा होती. परंतु भांडवल कमी पडत होतं. आमच्यातील ही जिद्द लक्षात घेऊन सलमान खानने आम्हाला आर्थिक मदत केली.
सहा वर्षापूर्वी सलमान खानच्या मदतीने आम्ही महाबली पुणेरी ढोल पथकाची स्थापना केली. सुरुवातील अगदी १२ ढोलच आमच्या पथकाकडे होते. आमच्यातील जिद्द आणि मेहनत दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे सहा वर्षापूर्वी १२ ढोलने सुरू झालेला आमचा प्रवास आता ४२ ढोलांवर येऊन ठेपला आहे.
सुरुवातील अगदी ३५ ते ४० वादक आमच्या पथकात होते. आता मात्र एकूण १०० वादकांचे मिळून आमचे पथक आहे. या पथकात तरुण वादक जसे सहभागी होतात तसेच तरुणी वादकही सहभागी होतात. त्यामुळे आम्ही फक्त मुलांपुरता हे पथक मर्यादित न ठेवता मुलींच्या कलेलाही वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.
आलेल्या ऑर्डरमध्ये आम्ही नवं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी ऑर्डरच्या आधी आम्ही सरावासाठी एकत्र येतो. प्रत्येकाच्या नव्या कल्पना ऐकतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. ढोल-ताशांच्या सरावासाठी प्रचंड पाठिंब्याची आवश्यकता असते. त्यामुळे कधी आम्ही आमच्या परिसरातच सराव करतो, अशा वेळेस एकही स्थानिक आम्हाला हटकत नाही, आमच्या कार्याला सहभाग करतात. कधी कधी रविवारच्या दिवशी जवळच असलेल्या कॉटन ग्रीन परिसरात आम्ही सरावासाठी जातो.
कोणाही अनुभवी लोकांचा पाठिंबा नसताना आम्ही पथकाची सुरुवात केली त्यामुळे अनेक स्तरांतून आमचं कौतुक केलं जातं. त्याशिवाय अनेक स्पर्धामध्येही आम्ही बाजी मारली आहे. त्यामुळे आमच्यातला हुरूप आणखी वाढत आहे. या पथकातून आम्ही सामाजिक प्रबोधनाचं कामही करतो.
ऑर्डरमधून आलेली थोडी रक्कम बाजूला ठेवून उरलेली रक्कम आम्ही समप्रमाणात वाटतो. परंतु बाजूला ठेवलेली रक्कम मात्र गरजूंना देतो. पथकातील वादकांना महाविद्यालयीन फीसाठी, गरजू रुग्णांना आमच्याकडून मदत केली जाते. तसेच दहावी-बारावीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांनाही आम्ही स्कॉलरशिप देत असतो.
उद्या गुढीपाडवा असल्याने आमच्याकडे प्रचंड ऑर्डर आल्या आहेत. त्यातून कोणती ऑर्डर निवडावी हा मोठा प्रश्न असतो. गुढीपाडव्याला लोकांचा उत्साह बघण्याजोगा असतो. त्यामुळे त्यांच्या उत्साहाकडे बघून आम्हालाही वाजवायला हुरूप येतो.