ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थी आता बाराखडी गिरवतानाच संगणकाचेही प्रशिक्षण घेणार आहेत.
ठाणे – महापालिका शाळांतील विद्यार्थी आता बाराखडी गिरवतानाच संगणकाचेही प्रशिक्षण घेणार आहेत. ई-क्लास प्रणालीमुळे हे शक्य होणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन शनिवारी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते झाले.
ढोकाळी येथील शाळेत एम्को फाउंडेशनच्या साहाय्याने आणि सावरकरनगर येथील शाळेत रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या साहाय्याने ई-क्लास प्रणाली राबवण्यात येणार आहे. या तंत्राच्या साहाय्याने दृक्-श्राव्य माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रणाली हाताळण्यासाठी या दोन शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे तंत्र पोहोचावे म्हणून महापालिकेच्या सर्व शाळांतील शिक्षकांना याचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी केली. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने या प्रणालीची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, महापालिका सचिव आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी मनिष जोशी उपस्थित होते.