पठाणकोट हवाई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरवर बंदीसाठी चीनने नकारघंटा वाजवली आहे.
संयुक्त राष्ट्र- पठाणकोट हवाई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरवर बंदीसाठी चीनने नकारघंटा वाजवली आहे.
मसूदवर बंदी घालण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ठेवला होता. मात्र चीनने ऐनवेळी नकार देत त्याला दहशतवादी ठरवण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या अटी आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेतील चीनचे प्रतिनिधी लीयू जिओयी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मसूदच्या बंदीबाबत तांत्रिक हरकत घेताना अधिक बोलण्यास नकार दिला. मसूदच्या बंदीवर नकाराधिकार देणा-या चीनच्या भूमिकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘जैश’वर बंदी असताना तिच्या प्रमुखावर बंदी नाही, हे अनाकलनीय असल्याचे भारताने बंदीचा प्रस्ताव आणताना म्हटले होते.
पठाणकोट हवाई तळावर जानेवारीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी भारताने मसूदविरोधात संयुक्त राष्ट्राकडे सबळ पुरावे सादर केले आहेत. या पुराव्याच्या आधारे संयुक्त राष्ट्राने अजहरवरील बंदीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यावर चर्चा घडण्याचे ठरवले होते. मात्र ही चर्चा सुरू होण्याच्या काही तास आधीच चीनने पाकिस्तानची पाठराखण करत मसूदवर बंदीसाठी नकाराधिकार वापरला.
चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेतूनच चीनने नकाराचा सूर लावला आहे. अझहरवर बंदीसाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आदी राष्ट्रांचा पाठिंबा असताना चीनच्या नकारघंटेमुळे या प्रस्तावावर चर्चाच झाली नसल्याने अझरवरील बंदी लांबणीवर पडली आहे. चीनने नेहमीच संवादातून चर्चेला प्राधान्य दिले आहे. मसूदप्रश्नी आम्ही भारताच्या संपर्कात आहोत, असेही चीनने म्हटले आहे.