महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १९ रोजी ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते स. ११ वा. होणार आहे.
दापोली- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या २३व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १९ रोजी ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते स. ११ वा. होणार आहे. स्वागतासाठी माता रमाबाई आंबेडकर साहित्य नगरी सज्ज झाली असून, संमेलनानिमित्त दापोली शहरातील काळकाई कोंड येथील श्रीकाळकाई मंदिर येथून पारंपरिक वेशभूषेत ग्रंथदिंडी निघणार आहे.
या वेळी वन पर्यावरणमंत्री रामदास कदम, डॉ. बा. सा. सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणाताई ढेरे, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत ऊर्फ नाना जोशी, मसाप पुणेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवीताई वैद्य, स्वागताध्यक्ष सूर्यकांत दळवी, मसाप दापोली शाखेचे कार्याध्यक्ष संतोष शिर्के, अभिनेते सुबोध भावे, लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे, शमिका भिडे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी पितांबरी उद्योग समूहाचे उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, जिल्हा सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आदी मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीला ‘माता रमाबाई आंबेडकर साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. दु.२ वा. साहित्यात कोकणचे योगदान व सद्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र दिवाडकर, ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव, कथाकार प्रवीण बांदेकर, लेखक तुषार भद्रे, डॉ. बाळासाहेब लबडे सहभाग घेणार आहेत. दु. ३.३० वा. ‘सौमित्र’अर्थात किशोर कदम यांची मुलाखत घेण्यात येणार असून, ही मुलाखत ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे घेणार आहेत. सायं. पाच निमंत्रितांच्या काव्यसंमेलनाचा कार्यक्रम ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कवी संमेलनात दादा मडकईकर, योगीराज माने, ए. के. शेख, दिलीप पांढरपट्टे, दीपक करंदीकर, प्रकाश होळकर, माधव पवार, शीला जाधव, सचिन चव्हाण, प्रा. कैलास गांधी, आश्लेषा महाजन असे एकूण २७ कवी सहभागी होणार आहेत.
पुन:श्च लोकमान्य जन्मभूमीत अवतरणार
रात्री ८.३० वा दरम्यान ‘लोकमान्य पुनश्च: जन्मभूमीत’ हा कार्यक्रम अभिनेते सुबोध भावे व कलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सुबोध भावे यांच्याबरोबर अभिनेत्री शर्वरी जमेनीस, लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे, शमिका भिडे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. यानंतर ‘आमचा बाप आणि आम्ही’ हा कार्यक्रम रात्री १० वा. लोककलाकार नंदेश उमप व ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते सादर करणार आहेत. २० रोजी स. ९ वा. बदलती माध्यमे व त्यातील वाचक , प्रेक्षक व श्रोते यांचे स्थान या विषयावर परिसंवादाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या परिसंवादात एबीपी माझाचे प्रसन्न जोशी, कलमनामाचे संपादक युवराज मोहिते, आकाशवाणीच्या उज्ज्वला बर्वे व आयबीएनचे संपादक मंदार फणसे सहभागी होणार आहेत. स.११ वा. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून, मसाप पुणे येथील प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे ही मुलाखत घेणार आहेत. हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होणार आहे. यानंतर दु. ३.३०वा. निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अरुण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमलन होणार आहे. सायं. ५.०० वा. समारोप होणार असून, उद्योजक रघुनाथ महाडिक, धनश्री पालांडे, ज्येष्ठ साहित्यिक शांताताई सहस्र्बुद्धे यांना गौरव मानपत्र देऊन विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणाताई ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने या २३व्या विभागीय साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे. या साहित्य संमेलनाला सर्व साहित्यिक रसिक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या संमेलनाचे यजमानपद असलेल्या मसापच्या दापोली शाखेकडून करण्यात आले आहे.