दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकिजची प्रस्तुती असलेल्या टाइम पास म्हणजेच ‘टीपी’या चित्रपटाचा नेटीझन्समध्ये बोलबाला सुरू झाला आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या ट्रेलरला एक लाखाच्या वर हिट्स मिळाल्या अहेत. बालक पालक (बीपी) या चित्रपटामधून मुलांच्या भावविश्वातचा एक वेगळा पैलू मांडणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा टीपी हा नवा चित्रपट येत्या तीन जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची कथा यातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, उदय सबनीस, सुप्रिया पाठक, भूषण प्रधान, उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका असून नायक नायिकेच्या भूमिकेत बीपी फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी यू टय़ूबवर टाकण्यात आला होता. त्याला केवळ तीन दिवसांत एक लाखाच्या वर हिट्स मिळाल्या असून अनेकांनी हा ट्रेलर फेसबुकवरही शेअर केला आहे. एवढय़ा कमी वेळात जास्त हिट्स मिळवणारा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्याकथेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटसृष्टीत कोणाचे तारे कधी बुलंद होतील हे काही सांगता येत नाही. एकेकाळी आपल्या अस्तित्वासाठी झगडणारी कतरिना आता चक्क नंबर वनच्या शर्यतीत आली आहे. एका बाजूला दीपिका एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत असतानाच आता कतरिनाही लागोपाठ तीन हिट चित्रपट देण्यासाठी सज्ज झाली आहे. येणा-या दोन महिन्यांत तिचे तीन चित्रपट झळकणार आहेत. त्यात तिच्या भूमिकाही वेगवेगळय़ा आहेत. त्यामुळे टीकाकारांचीही तोंडं आपोआप बंद होणार आहेत. ‘धूम ३’ या अॅक्शन चित्रपटात ती आहेच. त्याच पाठोपाठ ती ‘बँग बँग’ या अॅक्शन रोमँटिक चित्रपटातही दिसणार आहे. त्यानंतर ती ‘फितूर’ या एका संवेदनशील, हळुवार अशा टाइमलेस प्रेमकथेत झळकणार आहे. आपल्या नृत्याच्या पाठोपाठ आपल्या अभिनयाचेही जलवे दाखवणा-या कतरिनाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात आता शंका बाळगायला नको. एकेकाळी तिचा पासपोर्ट तपासून पाहावा, अशी इच्छा अनेक अभिनेत्रींनी व्यक्त केली होती. ती आता भारतीय प्रेक्षकांवर आपली चांगलीच जादू पसरवतेय.
आपल्या देशाचे राज्यस्तरीय विभाजन हे भाषावार झाले आहे. एका भागात बोलल्या जाणा-या भाषेच्या अनुषंगाने हे विभाजन आहे. तरीही भारतातल्या व्यक्तीला आपल्या मातृभाषेखेरीज किमान तीन भाषा याव्याच लागतात असं चित्र आहे. चित्रपटात साधारणत: एकच भाषा वापरली जाते. कधी कधी हिंग्लीशसारख्या हिंदी-इंग्रजी मिश्रभाषेचाही प्रयोग होतो. मात्र ज्ञानेश्वर मर्गज यांच्या आगामी ‘राजभाषा’ या चित्रपटात तब्बल ३५ भाषा वापरण्यात आल्या आहेत. बरं या विविध पात्रांच्या तोंडीही नाहीत. या चित्रपटाची नायिका विशाखा हिच्याच तोंडी ३५ भाषा ऐकायला मिळते. आपल्या जीवनातला हा एक वेगळाच अनुभव असल्याचं ती म्हणते. अनेक प्रमुख भाषांबरोबरच झाडीबोली, चंदगडी, देहवाली, मांगेली, कारवारी, डांगी, आसामी, गौंडी, जिप्सी, पाली, रायपुरी अशा वेगवेगळ्या भाषांचाही त्यात समावेश आहे. या भाषा तिने केवळ बोलायच्या म्हणूनच बोलल्या नाहीत, तर त्या भाषांचा योग्य अभ्यास करूनच त्या सादर केल्या आहेत. आता या चित्रपटाचं कथानक आणि तिच्या अभिनयाबरोबरच या भाषाही या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरल्या आहेत. हा चित्रपट एकाच वेळेस अनेकांना आपलीच भाषा राजभाषा असल्याचं समाधान मात्र मिळवून देईल हे निश्चित.
लहानपणी ऐकलेले रिंगा रिंगा रोझेस हे गाणं आठवतंय? किती छान होतं ते. पण आता मात्र हे शब्द ऐकून घाबरायला होईल. ३० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या लाइफ ओकेवरील ‘खौफ बिगिन्स.. रिंगा रिंगा रोझेस’ या मालिकेत वडील आणि मुलीची असाधारण गोष्ट आहे. धोका आणि अनोळखी वाईट ताकदींसोबतचा प्रवास रेखाटला आहे. या शोमधून अनुत्तरीत जग आणि वास्तविक जग यांच्यामधील रेषा पुसट होताना दिसतेय. चांगलं आणि वाईट यामधील या युद्धामध्ये वाईट शक्ती जेडीच्या मुलीला घेऊन जाते. वाईट शक्तीच्या हातून आपली मुलगी मैत्री हिला सोडवण्यासाठी जेडीचा ऊर्फ समीरचा लढा यात दिसून येईल. पॅरानॉर्मल रिसर्च अँड इनव्हिस्टिगेशन डिपार्टमेंट – पी आर. ए. आय. डी. च्या टीमसोबत ते वाईट शक्तीसोबत हा लढा देतील. या टीममध्ये मनोज वर्मा रिसर्च स्पेशालिस्ट जफरच्या रूपात, रिषभ चढ्ढा डेटा अॅनालिस्ट सुब्बूच्या रूपात, अविगैल जैन इंटर्नमारियाच्या रूपात दिसेल. पुणे स्थित रॉक बँड अग्नीला या शृंखलेसाठी थीम ट्रॅक बनवण्यासाठी आणण्यात आलं आहे.
दीपिका आणि इम्रान लक्सचे नवे ब्रँड अॅम्बेसेडर
लक्सच्या जाहिरातीत तुम्ही दीपिका आणि इम्रान खानला पाहिलं असेलच. ते पाहून चकित झाला असाल तरी डोन्ट वरी. कारण सौंदर्य आणि फिल्म स्टार्सशी निगडित असलेला प्रतिष्ठित ब्रँड लक्सने आपल्या तारकाच्छादित मैफिलीत बॉलिवुड दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता इम्रान खान यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतलं आहे. सप्टेंबरमध्ये बँकॉकमध्ये शूटिंग करताना हे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर्स शॉट्सदरम्यान आपली मैत्री पुनरुज्जीवित करताना, वेळ घालवताना, धमाल करताना दिसून आले. स्विस फिल्ममेकर इव्हो बेजगार्ड दिग्दर्शित दीपिका आणि इम्रान ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याच्या रिमिक्सवर उत्कृष्ट नृत्य सादर करतील.