प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील या तीन माजी आमदारांसह मनसेचे नेते अखिलेश चौबे यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करणारे प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील या तीन माजी आमदारांसह मनसेचे नेते अखिलेश चौबे यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेत मोठे खिंडार पडले आहे.
वसंत गीते यांच्या प्रवेशामुळे नाशिक महापालिकेतील राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी राजकारणात अशक्य काहीच नसते, अशी प्रतिक्रीया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या दोघांनीही पक्षनेतृत्वावर टिका केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारत सर्वांना धक्का दिला होता. तेव्हापासूनच ते भाजपाच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, प्रवीण दरेकरांनी काही वर्षांपूर्वी दिलेली सुरक्षा जीपही राज ठाकरे यांनी परत पाठवून दिली. त्यामुळे दुखावलेल्या दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी द्यायचे नक्की केले.
प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील या तीन माजी आमदारांसह मनसेचे नेते अखिलेश चौबे यांनीही मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेसाठी हा मोठा हादरा समजला जात आहे. दरेकर आणि गीते यांच्या प्रवेशामुळे उत्तर मुंबई, रायगड आणि नाशिकमधील भाजपची ताकद वाढणार आहे.