मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतच्या चर्चाना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे अखेर रविवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले. सोबतच त्यांनी सात उमेदवारांची पक्षाची पहिली यादीही जाहीर केली. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत दुसरी यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतच्या चर्चाना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. मनसेची ताकद काय आहे, ते या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून देऊ. निवडून आलेले मनसेचे सर्व खासदार हे नरेंद्र मोदींनाच पािठबा देतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले. प्रचारसभांच्या माध्यमातून राजकीय फटकेबाजी केली जाईल असे सांगत त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले.
पहिल्या यादीत दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबई येथून आदित्य शिरोडकर, उत्तर पश्चिम मुंबईतून महेश मांजरेकर, कल्याण येथून राजीव पाटील, पुण्याहून दीपक पायगुडे, नाशिक येथून डॉ. प्रदीप पवार आणि शिरुरमधून अशोक खांडेभराड यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे जाहीर केलेल्या सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे थेट शिवसेनेच्या उमेदवारांना आव्हान देणार आहेत.
दरम्यान, महायुती ही भक्कम असून कार्यकर्ते केवळ महायुतीच्याच उमेदवारांचा प्रचार करतील. मनसे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांनी व मतदारांनी त्यापासून सावध राहावे, असे आवाहन भाजप नेते विनोद तावडे यांनी केले. तर भाजप व मनसेचा हा एक छुपा अजेंडा आहे. शिवसेना कमकुवत होत असल्याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे त्यांनी मनसेला हाताशी धरले. मनसेची मराठी बाबतची भूमिका लक्षात घेता भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फटका बसू शकतो. या भीतीमुळेच मनसेबरोबर उघड युती न करता छुपी युती भाजपने केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
पानसे, धांडे, गायकवाड मनसेत
भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे, शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विष्णू गायकवाड यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. ही तर एक झलक आहे अजून खूप काही बाकी आहे, असे मार्मिक विधान मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या वेळी केले.
शिवसेनेवर टीकास्त्र
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य केले नसले तरी आमदार बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे यांनी मात्र थेट शिवसेना नेतृत्वालाच लक्ष्य केले. शिवसेनेचे नेतृत्व हे विकाऊ असल्याची जळजळीत टीका शिंदे यांनी केली. शिवसेनानेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना गंडा बांधत आहे. पण त्याच वेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीत राजकुमार धूत यांना २५ कोटींचा गंडा घातल्याचा आरोप त्यांनी केला. मनसे कार्यकर्त्यांना गंडय़ांची गरज नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेचे खिल्ली उडवली.
मनसेची उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई- आदित्य शिरोडकर
उत्तर-पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण-डोंबिवली -राजू पाटील
शिरुर – अशोक खंडेभराड
नाशिक – डॉ.प्रदीप पवार
पुणे – दीपक पायगुडे