मध्य रेल्वेला प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी यावर्षी ७८ कोटीचा निधी मिळाला आहे.
मुंबई – मध्य रेल्वेला प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी यावर्षी ७८ कोटीचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा निधी दुप्पट आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी सांगितले. त्यात आणखी १० कोटी रूपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी हा निधी ३८ कोटी मिळाला होता.
या निधीतून मध्य रेल्वेवरील फलाटांचे छप्पर, पादचारी पूल, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय आणि विद्युतीकरणाची कामे केली जाणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याने राज्यातील सर्व खासदारांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ७८ कोटींच्या निधीशिवाय आणखी १० कोटींचा निधी दिला असल्याचे जैन यांनी सांगितले. दरम्यान सरकत्या जिन्यांसाठी वेगळा निधी दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे स्थानकातला सरकता जिना १५ ते ३१ मार्चमध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती जैन यांनी दिली आहे.