मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा ८९ वर पोहचला असून १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
भोपाळ- मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा ८९ वर पोहचला असून १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा स्फोट झाला.
पेटलावाड शहरातील सेठीया हॉटेलजवळच्या इमारतीत मायनिंग आणि विहिरीतील दगड फोडण्यासाठी लागणारे स्फोटक सामान ठेवले होते. यात डिटोनेटर्स, जिलेटीनच्या कांड्या असल्याने त्यांना आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारी असलेल्या शेठीया हॉटेलमध्ये आग लागली आणि तेथील सिलिंडरचा स्फोट झाला.
पेटलावाड येथे थंतला रस्त्यावर असलेल्या या तीन मजली इमारतीमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे हॉटेलचे छतही कोसळले.
यात ८९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पेटलावाडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या हॉटेलजवळ सकाळी नाका कामगार मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवण्यासाठी उभे असतात. तसेच जवळच गाडीतळ असल्याने या हॉटेलमध्ये प्रवासी चहापानासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात.
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमींवर नि:शुल्क उपचार करण्यात येणार असून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
विहिर खोदकामासाठी लागणारे स्फोटक सामान ठेवण्याचे राजेंद्र कसावा यांच्याकडे सरकारचा परवाना असल्याचे चौकशीत आढळले.