दारू पिऊन गाडी चालवणे हे रस्ते अपघातांमधील प्रमुख कारण असल्याने, अशा प्रकारे गाडी चालवू नका, असे आवाहन अनेकदा पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून केले जाते.
दारू पिऊन गाडी चालवणे हे रस्ते अपघातांमधील प्रमुख कारण असल्याने, अशा प्रकारे गाडी चालवू नका, असे आवाहन अनेकदा पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून केले जाते. अशा वाहनचालकांविरोधात कारवाई देखील केली जाते. मात्र, तरीही दारू पिऊन गाडी चालवणे कमी होत नाही. या समस्येवर काही काळात उपाय मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील संशोधक मद्यपी वाहनचालकांना वाहन चालवण्यापासून रोखणारे श्वास आणि स्पर्शावर आधारित सेन्सर तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. या सेन्सरमुळे मद्यपी वाहनचालकांना त्यांची गाडी सुरू करता येणार नाही.
यामागील संकल्पना अशी आहे की, जर वाहनचालकाने कायदेशीर मर्यादेच्या पलीकडे मद्यप्राशन केले असेल तर त्याला गाडी सुरू करताच येऊ नये.स्पर्शावर आधारित सेन्सरमुळे जेव्हा वाहनचालक गाडीचे स्टार्ट बटन दाबून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी एक ‘स्मार्ट इन्फ्रारेड’ प्रकाश त्याच्या बोटावर पडतो. हा प्रकाश बोटाच्या पेशींमध्ये अल्कोहोलचा शोध घेऊ लागतो. अल्कोहोलला त्याची स्वत:ची अशी वेगळी प्रकाशीय ओळख असते त्यामुळे जर या चाचणीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित ०.८ या मर्यादेच्या बाहेर असल्याचे निश्चित झाले तर गाडी जागेवरून हलणारच नाही.
या प्रणालीतील श्वासावर आधारित सेन्सर ‘स्टीअरिंग व्हील’वर बसवलेला असतो. या सेन्सरमधील इन्फ्रारेड प्रकाश चालक आणि व्हील यांच्या दरम्यान असलेल्या भागातील रेणू सक्रिय करतो व चालकाच्या श्वासात किती प्रमाणात अल्कोहोल आहे ते निश्चित करतो. अमेरिकेच्या एका कंपनीकडून विकसित होणारा हा १ कोटी डॉलर खर्चाचा प्रकल्प अमेरिकी सरकार व १६ वाहन उद्योगांचा संयुक्त प्रकल्प आहे.
मात्र, अमेरिकेतील मद्यनिर्मिती उद्योगाचा या प्रकल्पाला विरोध आहे. अमेरिकेत या उद्योगाच्या साखळीत ८००० रेस्टॉरंट्स आहेत. दारू पिऊन गाडी चालवून होणा-या अपघातांचे प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अल्कोहोल शोधणा-या या तंत्रज्ञानाचा वापर सर्व अमेरिकी नागरिकांवर करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील, असे हे तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपनीने सांगितले आहे.