नशेत असलेला डॉक्टर रुग्णांना तपासताना बेशुद्ध पडल्याची घटना साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी घडली. येथे कार्यरत असणारे डॉ. सारंग रुग्णांना तपासत असतानाच दारूच्या नशेत जमिनीवर कोसळले.
दोडामार्ग -दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांना तपासताना बेशुद्ध पडल्याची घटना साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी घडली. येथे कार्यरत असणारे डॉ. सारंग रुग्णांना तपासत असतानाच दारूच्या नशेत जमिनीवर कोसळले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये एकच गोंधळ उडाला. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले.
साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्ण मोठया प्रमाणात तपासणीसाठी येत असतात. सोमवारीही आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग मात्र दारूच्या नशेत होते. अशा अवस्थेतच रुग्ण तपासत असताना ते बेशुद्ध पडले. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी व रुग्णांमध्ये एकच गोंधळ उडाला. याची माहिती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमेश दळवी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांना बोलावून डॉ. सारंग यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. या प्रकारामुळे रुग्णांची परवड झाली. तर रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आपण दारूच्या नशेत नव्हतो. आपल्याला चक्कर आल्याने आपण जमिनीवर पडलो, असा खुलासा डॉ. सारंग यांनी दिला आहे.
बेशिस्त डॉक्टरची गय नाही
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आणि समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तात्काळ माहिती मागवून अशा प्रकारे बेशिस्त वागणा-या वैद्यकीय अधिका-यावर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनाही चौकशीच्या सूचना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.