लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री किंवा अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधींना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
भोपाळ- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीच्या अध्यक्षांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी दिले.
निवडणूक ही नि:पक्षपाती, शांततापूर्ण आणि दबाव नसलेल्या वातावरणात व्हायला हवी, असे आयोगाचे धोरण आहे. मतमोजणी केंद्रावर लोकप्रतिनिधी आल्यास त्यांचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुद्दुचेरी येथील मुख्य निवडणूक अधिका-यांनी लोकप्रतिनिधींना सुरक्षेशिवाय मतमोजणी केंद्रावर परवानगी द्यावी का? अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्र किंवा राज्याच्या मंत्र्याला सशस्त्र सुरक्षा व्यवस्था मतमोजणी केंद्रावर आणता येणार नाही, असे निर्देश यापूर्वीच निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमता येणार नाही, असेही आयोगाने सांगितले.