केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी होणार असून नव्या चेह-यामध्ये काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागांबरोबरच अन्य दुरेही जबाबदारी असलेल्या मंत्र्यांवरील जबाबदारीचे ओझे कमी करण्याचे संकेत याआधीच काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.
या मंत्रिमडंळातील विस्तारामध्ये काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधींचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल यांच्यासह अन्य काही नव्या चेह-यांचा समावेश मंत्रिमडंळात होण्याची शक्यता आहे. तर काही मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे.
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांच्यामंत्रिमंडळातील समावेशाचे संकेत याआधीच दिले आहेत. आतापर्यंत राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात येण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आठवड्यापूर्वच राहुल गांधींनी पंतप्रधान डॉ.सिंग यांच्यासह राष्ट्रपतींची भेट घेतली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याऐवजी त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या रस्ते आणि वाहतूक मंत्री सी.पी.जोशी यांच्याकडे रेल्व खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा राज्यात पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी यांनी १७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान डॉ.सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राहुल गांधींचा समावेश मंत्रिमंडळात होण्याची चर्चा सुरु झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.