अफगाणीस्तान, उत्तर कोरीया आणि सोमालिया या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे ट्रन्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
बर्लिन- अफगाणीस्तान, उत्तर कोरीया आणि सोमालिया या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे ट्रन्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. या यादीत भारत ९४व्या स्थानी आहे.
जगभरातील भ्रष्टाचारावर नजर ठेवणा-या बर्लिन येथील ट्रन्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने २०१३मधील आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील तब्बल ७० टक्के देशांमध्ये भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
या संस्थेने १७७ देशांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. यादीत भारत ९४व्या स्थानी तर पाकिस्तान आणि चीन अनुक्रमे १२७व्या आणि ८०व्या स्थानी आहेत.
संस्थाने प्रत्येक देशाला शून्य ते १०० असे गुण दिले आहेत. शून्य म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचार तर १०० गुण म्हणजे सर्वात स्वच्छ प्रशासन होय. भारताचा समावेश ३० ते ३९ गुण या गटात करण्यात आला आहे.
सर्वाधिक भ्रष्ट देशांनमध्ये इराक, लिबिया, सुदान, दक्षिण सुदान, यमन उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. तर स्वच्छ प्रशासनामध्ये डेन्मार्क,न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांचा समावेश असल्याचे ट्रन्सपरन्सी इंटरनॅशनलने म्हटले आहे.