मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड स्टेशनमधून बाहेर पाडण्यासाठी मध्य रेल्वेने बांधलेला पादचारी पूल चुकीच्या ठिकाणी आहे.
नेरळ – मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड स्टेशनमधून बाहेर पाडण्यासाठी मध्य रेल्वेने बांधलेला पादचारी पूल चुकीच्या ठिकाणी आहे. तेथून स्टेशनबाहेर पडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. १५ दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास प्रवासी संघटना आंदोलन करणार आहे.
भिवपुरी रोड स्टेशन परिसरात दोन्ही बाजूला रेल्वेच्या चार मार्गिका आहेत. त्यात प्रत्येकी दोन मार्गिकांत एक फलाट आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी रेल्वे मार्गिका ओलांडून बाहेर पडतात. परिणामी भरधाव आलेल्या ट्रेनमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात अनेकदा माल वाहतूक करणा-या मालगाडय़ा माíगकांवर उभ्या असतात. दुसरीकडे स्थानकातून बाहेर पाडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एक पादचारी पूल स्थानकाच्या मधोमध बांधला आहे, मात्र या पुलावरून प्रवासी जात असताना त्यांना फुटपाथ अथवा रस्ता रेल्वे प्रशासनाने दोन्ही ठिकाणी तयार केला नाही. परिणामी फलाट दोनच्या बाहेर पाडण्यासाठी रेल्वे लाइन किंवा माíगका ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नसतो. शाळेतील मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिला तसेच नोकरदारांना रेल्वे माíगका ओलांडून जीव मुठीत घेऊन जावे लागते.
फलाट दोनकडील बाजूस पादचारी पुलास फुटपाथ जोडावा आणि तेथे येण्यासाठी रस्ता करावा, या मागणीसाठी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. १५ दिवसांत रेल्वे प्रशासनाने संबंधित विषयावर कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.