भिवंडीत मागील २ दिवसांत पोलिसांनी डान्स बार व अनैतिक धंदे चालणा-या लॉजिंगवर ठाणे पालियांनी धाडसत्र सुरू केले आहे.
भिवंडी – भिवंडीत मागील २ दिवसांत पोलिसांनी डान्स बार व अनैतिक धंदे चालणा-या लॉजिंगवर ठाणे पालियांनी धाडसत्र सुरू केले आहे. सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत यात चार ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून सुमारे ६० बारबालांसह ७२ जणांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी-कल्याण रस्त्यावरील रांजणोली नाका भागात असलेल्या पारो बार, हॉटेल भोलेसाई बार रेस्टॉरंट, सात सितारा लॉजिंगवर या धाडी आकण्यात आल्या. याठिकाणी अनतिक व्यवसाय चालत असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना मिळाल्यानंतर त्यांनी ठाणे गुन्हे शाखेला या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार रविवारी रात्री केलेल्या कारवाईत २२ बार मालक-कर्मचारी व ४५ बारबालांना अटक करण्यात आली. तर सात सितारा लॉजिंगवर धाड टाकून तेथून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका २२ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली. यानंतर गुन्हे शाखेच्या रविवारच्या कारवाईनंतर जाग्या झालेल्या नारपोली पोलिसांनी सोमवारी रात्री माणकोली गावाजवळील डब्ल्यूडब्ल्यूएफ बारवर धाड टाकली. रविवारी रात्रीच्या धाडींमध्ये पारो बारचा मॅनेजर विल्यम डिसूझा, कॅशियर रवी दास व ८ वेटर, हॉटेल भोलेसाई येथील बार रेस्टोरंटचा चालक सुरेश शेट्टी, मॅनेजर अर्शद शेख व ४ वेटर आणि सात सितारा लॉजिंगचा मालक रमेश शेट्टी या सर्वाना अटक करण्यात आली. तर सोमवारच्या डब्ल्यूडब्ल्यूएफ बारवरील धाडीत १५ बारबाला व ५ ग्राहकांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या आशिर्वादाने गोरखधंदे सुरू?
ज्या भागांत ठाणे गुन्हे शाखेने या धाडी टाकल्या, तो भाग मुंबई-नाशिक महामार्गावरील भाग असून या भागात अशाच प्रकारचे अनेक बार आहेत. मात्र त्यांना स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्यानेच कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. तर गुन्हे शाखा किंवा मानवी तस्करीविरोधी पथकाने येथे छापा टाकल्यानंतर स्थानिक पोलीस जागे झाल्यासारखे कुठल्यातरी बारवर धाड टाकतात, असे पाहायला मिळते. याबाबत ठाणे पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.