जगज्जेतेपदाच्या लढतीच्या तयारीसाठी विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या प्रतिस्पध्र्यानी भिन्न तंत्र अवलंबल्याचे दिसत आहे.
जगज्जेतेपदाच्या लढतीच्या तयारीसाठी विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या प्रतिस्पध्र्यानी भिन्न तंत्र अवलंबल्याचे दिसत आहे. जूननंतर आनंद स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळला नसून कार्लसन मात्र सप्टेंबरच्या अखेपर्यंत विविध स्पर्धामध्ये सहभागी झाला आहे.
सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील पहिल्यावहिल्या सिंक्वेफिल्ड कपमध्ये कार्लसनला हिकरू नाकामुरा आणि गॅटा कामस्की या अमेरिकेच्या अव्वल प्रतिस्पध्र्याविरुद्धही खेळावे लागले. ते पाहता त्याचा जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी चांगला सराव झाला. या महिन्यात त्याने विश्रांती घेऊन ताजेतवाने होण्यावर भर दिला आहे. महिन्याच्या सुरुवातीला त्याने नॉर्वेतील त्याच्या ओस्लो येथील निवावस्थानी भेट दिली.
त्यावेळीही झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आनंदसारख्या अनुभवी बुद्धिबळपटूला नमवण्यासाठी योग्य ते नियोजन केले असल्याचे म्हटले होते. भारत दौ-यावर येण्यापूर्वी तो आणखी एका ठिकाणी ताजेतवाने व्हायला जाणार होता. याउलट गेल्या काही महिन्यांमध्ये आनंदने त्याच्या ‘टीम’सोबतच सराव करण्याला प्राधान्य दिले.
नवरात्री सण आपण नेहमीच उत्साहात साजरा करतो. त्याप्रमाणे यंदाही केला, असे आनंदने नुकतेच म्हटले. नवरात्रीच्या निमित्ताने आपण थोडे ताजेतवाने झालो, असे त्याचे म्हणणे आहे.
तयारीसाठी कोणते तंत्र अवलंबवणार आहोत, याविषयी कार्लसन आणि आनंद या दोघांनीही जाहीर चर्चा केली नसली तरी दोघेही आपापल्या परीने पूर्ण तयार असल्याचे दिसते. फक्त जगज्जेतेपदाच्याच नाही तर कारकीर्दीत प्रत्येक लढतीला आपण महत्त्व देतो, असेही आनंदने म्हटले.