३६ वर्षानंतर भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/10/HOCKEY-JUNIOR-WOMENS-PLAYER.jpg)
नवी दिल्ली – ३६ वर्षानंतर भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. लंडनमध्ये झालेल्या महिलांच्या युरोपियन हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्पेनवर विजय मिळवल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
अंतिम फेरीत भिडणारे इंग्लंड आणि हॉलंड दोन्ही संघ रिओ ऑलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरल्यामुळे एक जागा रिकामी झाली होती. त्यातून भारताचा प्रवेश झाला. मागच्या महिन्यात बेल्जियममध्ये झालेल्या महिला हॉकी वर्ल्ड़ लीगच्या उपांत्यफेरीत भारताला पाचवे स्थान मिळाले होते. त्या आधारावर भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून भारतीय महिला हॉकी संघ पात्र ठरल्याची घोषणा करण्यात आली. हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्यावेळीच इंग्लंड आणि हॉलंडचे महिला संघ पात्र ठरले होते.
कोरिया, अर्जेंटिना, इंग्लंड, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड, न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांचे महिला हॉकी संघ आधीच पात्र ठरले होते. यापूर्वी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघ पात्र ठरला होता. त्यावेळी भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.