अमेरिकेत पोलिसांच्या मारहाणीमध्ये सुरेश पटेल (५७) यांना अर्धांगवायु झाल्याच्या घटनेसंदर्भात अमेरिकेच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेत पोलिसांच्या मारहाणीमध्ये सुरेश पटेल (५७) यांना अर्धांगवायु झाल्याच्या घटनेसंदर्भात अमेरिकेच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेसंदर्भात भारताशी राजनैतिक चर्चा करण्याचे कोणतेही संकेत अमेरिकेतर्फे यावेळी देण्यात आले नाहीत.
आपल्या नातवाला पाहण्यासाठी सुरेश पटेल दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेत मुलाकडे गेले होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी मुलाच्या घराजवळ पदपथावरून फिरणा-या पटेल यांना पोलिसांनी अडवून चौकशी सुरू केली. जुजबी इंग्रजी बोलणा-या पटेल यांच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवले.
गोंधळलेल्या पटेल यांनी खिशात हात घातला. यावरून संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पटेल गंभीर जखमी झाले असून, त्यांना अर्धागवायूचा झटकाही आला आहे.
पटेल यांच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी हे कृत्य केले. विदेश मंत्री व विदेश मंत्रालयातर्फे पटेल यांना सहन कराव्या लागलेल्या या परिस्थितीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी म्हटले आहे.
संबंधित बातमी….