ऑस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताचा १०६ धावांनी दणदणीत पराभव केला.
अॅडलेड ओव्हल– नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारताला पहिल्या विजयाची प्रतीक्षा सराव लढतीतूनही संपवता आली नाही. त्यातच विश्वचषकापूर्वी पहिलीच सराव लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी खेळावी लागल्याने पुन्हा एकदा भारतीय संघाच्या उणिवा स्पष्ट झाल्या. पहिल्याच सराव लढतीत भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाकडून १०६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकांनी भारताला सपशेल माघार घ्यायला लावली. त्या दोघांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले. ते गाठताना भारत ४५.१ षटकांत २६५ धावांमध्येच गारद झाला.
रोहित शर्मा (८) आणि विराट कोहली (१८) टिकले नाहीत. शिखर धवन (५९) आणि अजिंक्य रहाणे (६६) यांनी अर्धशतके झळकवली तरी भारताचा मोठा पराभव टळला नाही. हे दोघे बाद झाल्यावर फटकेबाजी केली ती अंबाती रायडूने. त्याने ४२ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह ५३ धावा फटकवल्या. त्याची खेळी अॅडलेडवर ब-यापैकी उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन करून गेली. सुरेश रैना (९) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (०) अपयशी ठरले. धोनी तर पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हॅझेलवुड, जॉन्सन आणि स्टार्कने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. नवीन चेंडू मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिन्नीकडे सोपवण्याचा वेगळा प्रयोग धोनीने केला. त्याने अॅरन फिंचला (२०) लवकर बाद केले. पाठोपाठ इशांतच्याजागी निवड झालेला मोहित शर्माने शेन वॉटसनचा (२०) अडसर दूर केला. पाठोपाठ उमेश यादवने स्टीवन स्मिथला (१) बाद केले. मात्र वॉर्नर एकाबाजूने फटकेबाजी करत होता. अखेर अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात शतकवीर वॉर्नरला बाद केले. मात्र भारतीय गोलंदाजांची सुटका झाली नाही. कारण मॅक्सवेलने भारताच्या आठही गोलंदाजांना चोपून काढत ११ चौकार आणि ८ षटकार झळकवले. मोहित शर्मा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या असल्या तरी ६ षटकांत ६२ धावा दिल्या.
भारताची दुसरी सराव लढत मंगळवारी
भारताला आता दुसरी आणि अखेरची सराव लढत मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची आहे. त्या लढतीचे थेट प्रक्षेपणही स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरुन होणार आहे.