इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी आजपासून ट्रेंटब्रिजवर
नॉटिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी क्रिकेट कसोटी शनिवारपासून (१८ ऑगस्ट) नॉटिंगहॅम येथील ट्रेंटब्रिज मैदानावर खेळली जात आहे. ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या विराट कोहली आणि सहका-यांसमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान आहे. संघबदल अपेक्षित असून पाहुण्यांचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचे कसोटी पदार्पण नक्की मानले जात आहे.
एजबॅस्टन आणि लॉर्ड्स कसोटीतील मानहानीकारक पराभवातून सावरण्याच्या दृष्टीने भारताच्या क्रिकेटपटूंचा कस लागेल. फॉर्मात असलेल्या इंग्लंडला रोखण्याच्या दृष्टीने पाहुण्या क्रिकेटपटूंना सर्व आघाडय़ांवर खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे. कोहली आणि कंपनीला फलंदाजीतील अपयश सतावत आहे. पाहुण्यांसमोर सलामीचा पेच आहे. भारताने मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांचा सलामीसाठी आलटून-पालटून वापर केला तरी सलामीची समस्या कायम आहे.
कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे. आघाडीसह मधल्या फळीतील अपयशही भारतासाठी चिंतेची बाब आहे. मागील चार डावांमध्ये अपयशी ठरलेला यष्टीरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिक (०, २०, १, ०) याच्या जागी रिषभ पंत यांची निवड नक्की मानली जात आहे. इंग्लंड संघामध्येही बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स याचे संघात पुनरागमन झाले आहे. सॅम कुरॅन याच्या जागी त्याचा समावेश झाला.
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (राखीव यष्टीरक्षक), करुण नायर, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश शर्मा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा.
इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, कीटन जेनिंग्ज, डेव्हिड मॅलन, जॉनी बेअस्टरे (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, ऑली पोप, जोस बटलर, अदिल रशिद, सॅम कुरॅन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
वेळ : सायं. ३.३० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन थ्री.