दुसरी वनडे आज; इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला
लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी एकदिवसीय (वनडे) लढत शनिवारी (१४ जुलै) खेळली जाणार आहे. विजयी सलामीनंतर विराट कोहली आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. सातत्य राखताना विजयी आघाडी घेण्यास पाहुणे उत्सुक आहेत. दुसरीकडे, यजमानांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यक आहे.
भारताने पहिल्या लढतीत सहज विजय मिळवला. ‘चायनामन’ स्पिनर कुलदीप यादव (६ विकेट) याच्या प्रभावी गोलंदाजीनंतर इंग्लंडने २६८ धावा केल्या तरी भारताने अवघ्या ४० षटकांत विजयी लक्ष्य गाठल्याने पाहुण्यांच्या धावा खूपच कमी ठरल्या. रोहित शर्माच्या तुफानी शतकामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. रोहितने ११४ चेंडूंत १५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १३७ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार विराट कोहलीचीही चांगली साथ लाभली. त्याने ७५ धावा केल्या. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (४० धावा) याला सूर गवसला. मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले.
भारतासाठी सर्वकाही आलबेल आहे. सातत्य राखून ३-० अशा फरकाने बाजी मारल्यास विराट आणि कंपनीला आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान (रँकिंग) आवाक्यात आहे. मात्र पाहुण्यांना, यजमानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. टी-२० मालिकेत त्यांनी दुसरी लढत जिंकून पुनरागमन केले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न इंग्लंड संघ करेल. मात्र त्यासाठी सर्वच आघाडय़ांवर कामगिरी उंचवावी लागेल. भारताच्या फिरकीपटूंना (विशेषकरून) कुलदीप यादवला खेळून काढण्याचे तंत्र त्यांना लवकर अवगत करून घ्यावे लागेल.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, हार्दिक पंडय़ा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अक्षर पटेल.
इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअस्टरे, अलेक्स हॅलेस, ज्यो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, अदिल रशिद, मार्क वुड, जेक बॉल, सॅम कुरॅन.
वेळ : दु. ३.३० वा.