बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सहाव्या फेरीत भारताला संमिश्र यश मिळाले
इस्तंबूल – बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सहाव्या फेरीत भारताला संमिश्र यश मिळाले. जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर परिमार्जन नेगीने मॅक्झिम रॉडश्टीनला हरवल्याने भारताच्या पुरुष संघाला इस्रयलला 2-2 असे बरोबरीत रोखता आले. महिलांनी जर्मनीवर 3-1 असा विजय मिळवला. बोरिस गेलफँडला कृष्णन शशीकिरणने बरोबरीत रोखले. दुस-या बोर्डवर पी. हरिकृष्णाने इमिल सुटोवस्कीला वरचढ होऊ देण्याची संधी दिली नाही.
अभिजीत गुप्ताला संधीचा फायदा उठवता आला नाही. ऑलिंपियाडमध्ये प्रथमच त्याला पराभूत व्हावे लागले. चौथ्या बोर्डवर परिमार्जन नेगी वि. मॅक्झिम रॉडश्टीन लढतीकडे सर्वाचे लागले. मात्र नेगीने अप्रतिम खेळ करत रॉडश्टीनवर मात करताना भारताला बरोबरी गाठून दिली. भारताच्या महिला संघाने कामगिरी उंचावताना जर्मनीचा 3-1 असा पराभव केला. तानिया सचदेव, सौम्या स्वामीनाथनने विजय मिळवले.
सहा फे-यानंतर भारतीय पुरुष संघ नऊ गुणांसह संयुक्तरित्या दहाव्या स्थानी आहे. सातव्या फेरीत भारताला अर्जेटिनाशी दोन हात करावे लागतील. महिला संघ संयुक्तरित्या सातव्या स्थानी आहे. पुढील फेरीत भारताच्या महिलांची गाठ इस्टोनियाशी पडेल.