महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून रिक्षाविरोधी आंदोलनाला आव्हान देऊ पाहणा-या भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून रिक्षाविरोधी आंदोलनाला आव्हान देऊ पाहणा-या भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला. मालाड येथे एका कार्यक्रमात कंबोज आले असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना गाठून हल्ला केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हल्लेखोर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
चार दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या ऑटो-रिक्षा परमिट कार्यक्रमावर शंका व्यक्त केली होती. सरकारचे एका खासगी कंपनीसोबत साटेलोटे झाले असून त्या कंपनीच्या हजारो नव्या रिक्षा मुंबईत येणार आहेत. तेव्हा अशा नव्या रिक्षा दिसल्यास जाळून टाका, असा इशारा ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. याचे पडसाद शहरात उमटले आहेत. अंधेरी येथे मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचे नुकसान केले. त्यावर भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी राज ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहिले.
या पत्रात मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचे नुकसान केल्यास तुम्हाला जबाबदार धरू, असा इशारा दिला होता. तुम्हाला मारहाणीचीच भाषा समजत असेल तर त्याच प्रकारे प्रतिक्रिया येऊ शकते, असा थेट इशाराही कंबोज यांनी दिला होता. त्यावरून मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री कंबोज यांच्या दिंडोशी भागातील कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर रविवारी कुरार व्हिलेज आप्पा पाडा येथे मोहित कंबोज एका कार्यक्रमासाठी आले होते. हे मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी कंबोज यांना कार्यक्रमात गाठले.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हल्ला करणा-या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षात आपणास कोणतीही मारहाण झाली नसून आपण सुखरूप असल्याचे कंबोज यांनी सांगितले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी शांत राहावे आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही कंबोज यांनी केले आहे.