सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात ठाणे महापालिकेचे चार संशयित नगरसेवक अद्याप अटकेत असतानाच असाच एक प्रकार डोंबिवलीलमध्ये समोर आला आहे
कल्याण- ठाण्यात बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात ठाणे महापालिकेचे चार संशयित नगरसेवक अद्याप अटकेत असतानाच असाच एक प्रकार डोंबिवलीलमध्ये समोर आला आहे. डोंबिवलीतील भाजपाच्या आमदाराकडून एका बांधकाम व्यावसायिकाचा मानसिक छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जगदीश वाघ असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून ‘युटय़ूब’वर व्हिडिओ टाकून त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. तर पत्रकार केतन तिरोडकर यांनी हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हा छळ केल्याचा वाघ यांचा आरोप आहे. आमदार चव्हाण यांनी आपल्या गाडय़ा, घर, खंबाळपाडा येथील जमिन बळकावली असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे जगदीश वाघ यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांच्यामुळे मला डोंबिवली सोडून अन्य ठिकाणी राहावे लागत असल्याचेही त्यांनी यात सांगितले आहे.
शिवाय या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही वाघ यांनी या व्हिडिओत सांगितले आहे. याबाबत वाघ यांनी स्थानिक प्रसारमध्यमांसमोर येण्यास मात्र टाळाटाळ केली असून सोशल मीडियावर पसरलेल्या या व्हिडिओमुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ माजली आहे.
प्रतिक्रियेसाठी कुणीच उपलब्ध नाही!
पत्रकार केतन तिरोडकर यांनी वाघ यांचा हा व्हिडिओ ३ दिवसांपूर्वी ‘यूटय़ूूब’वर अपलोड केल्यानंतर एकच खळबळ माजली. यानंतर याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी मुंबईबाहेर आहे’, असे तिरोडकर यांनी सांगितले. तर प्रकरणात भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांचे थेट नाव आल्याने त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकाराला कुणाकडूनही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
आमदारांच्या भावासह अतिरिक्त आयुक्तांचेही नाव
यामध्ये आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह त्यांचा भाऊ संकेत चव्हाण व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचेही नाव समोर आले आहे. आमदार व त्यांच्या भावाने आपल्याला करोडो रुपयांना लाटले, तर घरत यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले, असेही वाघ यांनी म्हटले आहे. त्यामुळे डोंबिवलीत चर्चेला उधाण आले आहे.
व्हीडिओमध्ये प्रशांत देशमुख याचेही नाव
जगदीश वाघ यांनी प्रसारित केलेल्या या व्हीडिओमध्ये प्रशांत देशमुख याचेही नाव समोर आले आहे. देशमुख हा कल्याण परिसरात राहात असून गंभीर गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे समजते. देशमुख याचा अंडरवर्ल्डशी संबंध असून या प्रकरणात छोटा राजन याच्या नावाचाही वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशांत देशमुखच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.