येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिले.
हैद्राबाद – येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिले.
नितीश कुमार यांच्यासोबत राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास काँग्रेस तयार आहे का? यावर ते म्हणाले की, हो. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, डाव्यांची मोट बांधण्याची मोठी शक्यता आहे. हा देश धर्मनिरपेक्ष राहावा अशी आमची इच्छा आहे. तो सर्वांचा विचार करणारा असावा. देशाच्या राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा भाजपासोबत प्रारंभीपासूनच लढा आहे.
बिहारमध्ये भाजपाचा नितीश कुमार यांनी पराभव केला ही बाब अत्यंत चांगली ठरली. सर्व राजकीय पक्षांनी काँग्रेसच्या भूमिकेला मान्यता दिल्यास ते योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जदयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड हा काँग्रेस व भाजपाला पर्याय वाटतो का? यावर सिंग म्हणाले की, राष्ट्रीय नेता बनण्याचा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. मात्र, त्याचा निर्णय जनतेकडे सोपवला पाहिजे.