प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून आटापिटा सुरू असताना आता एक नवीन पर्याय महामंडळातील वरिष्ठ अधिका-यांच्या विचाराधीन आहे.
मुंबई- प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून आटापिटा सुरू असताना आता एक नवीन पर्याय महामंडळातील वरिष्ठ अधिका-यांच्या विचाराधीन आहे. शिवनेरी गाडीचा प्रवास खिशाला परवडत नसल्याने आणि महामंडळाच्या साध्या बसने लांब पल्ल्याचा प्रवास करणे अवघड जात असल्याने अनेक प्रवासी खासगी स्लिपर बसचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे हा प्रवासीवर्ग एसटीकडे वळावा याकरता महामंडळाकडून ५०० स्लिपर कोच गाडय़ांचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे महामंडळातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवासात आरामाची सक्त गरज असताना सध्याच्या एसटी महामंडळाच्या साध्या बसमधून तासन् तास ताटकळत बसून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि प्रवास आरामदायी व्हावा याकरता मुंबई-नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई- औरंगाबाद, मुंबई-गोवा या मार्गावर ही सेवा सुरू करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. त्यामुळे खासगी बसने दिवसाला ९०० ते १ हजारांहून अधिक प्रवासी एसटीकडे वळतील, असा दावा एसटी महामंडळातील अधिकारी करत आहेत.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात मर्सिडीज बेंज, व्होल्वो आणि स्कॅनिया या कंपन्यांच्या आरामदायी गाडय़ा कार्यरत आहेत. मात्र नव्याने दाखल होणा-या नवीन स्लिपर बस या शिवनेरी आणि सध्याची हिरकणी साधी बस यांच्या मधला पर्याय असणार आहे. मात्र, या गाडय़ा कोणत्या कंपनीच्या असतील, आसन क्षमता किती असेल, तिकीट दर किती याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, दिवसेंदिवस एसटीचे घटते प्रवासी भारमान आणि खासगी वाहतुकीचे उभे राहिलेले आव्हान यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण १७ हजार गाडय़ा आहेत. ३५ हजारांहून अधिक वाहक व चालक प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडतात. मात्र खासगी वाहनांमुळे एसटीचे प्रवासी कमी होत आहेत. प्रवासी वाढवणे व महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील असून योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.