सोसाट्याच्या वा-यासह पावसाने शनिवारी रात्री जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.
भंडारा – सोसाट्याच्या वा-यासह पावसाने शनिवारी रात्री जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. तर अनेक घरे कोसळून पडली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वादळीवा-यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास पावसाचा धुमाकूळ सुरू होता. वेगाने वाहणा-या वा-यामुळे अनेक भागांत विजेचे खांब, वृक्ष आणि काही घरे कोसळली. जवाहरनगर भागात विजेचे खांब घरावर कोसळले. पण जीवितहानी झाली नाही. याच भागातील ठाणा, शहापूर, पेवठा आणि अन्य क्षेत्रांत गारांसह पाऊस झाला. जिल्ह्यात बहुतेक भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वाटाणा, गहू, हरभरा, मिरची आणि अन्य पिके जमीनदोस्त झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शहरासह अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारी रात्रभर खंडित झाला होता.