दुबई – जगातील अशा अनेक महागडय़ा कार ज्या खरेदी करण्याची आपण फक्त स्वप्ने पाहू शकतो, त्या जर रस्त्यावर भंगारमध्ये पडलेल्या आढळल्या तर तुम्ही काय कराल? हो, असाच काही प्रकार दुबईत पाहायला मिळाला. याठिकाणी पोलिसांकडे जगातील सर्वात महागडय़ा आणि बेवारस कार आढळल्याची ३००० प्रकरणे समोर आली आहेत.
दुबईच्या एका एअरपोर्टवर ५ कोटी किमतीची फेरारी सुपर कार बेवारस अवस्थेत आढळली. कच-याप्रमाणे धूळ खात पडलेल्या या कारच्या मालकाचा पत्ता नाही आणि पोलिसांनाही त्याचा रजिस्ट्रेशन नंबरही मिळालेला नाही. एकापाठोपाठ एक अशी हजारो प्रकरणे समोर आल्यानंतर हे समोर आले आहे की, दुबईतील शरियत कायदा यामागे कारणीभूत आहे. या कायद्यानुसार जर तुम्ही चेक किंवा उधारीवर एखादी कार घेतली आणि चेक बाऊन्स झाला, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.
मजेशीर बाब म्हणजे, काही लोकांनी या कायद्याची खिल्ली उडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही लोकांनी बनावट चेकद्वारे या कार खरेदी केल्या. त्यात मनसोक्त फिरले आणि जेव्हा चेक बाऊन्स झाला, तेव्हा या कार बेवारस सोडून दूर निघून गेले.