निवडणूक अधिका-यांना शनिवारी पहाटे बेल्लारीमध्ये एका सावकाराच्या घरात बेहिशोबी नऊ कोटी रुपयांची रोकड सापडली.
बेल्लारी – निवडणूक अधिका-यांना शनिवारी पहाटे बेल्लारीमध्ये एका सावकाराच्या घरात बेहिशोबी नऊ कोटी रुपयांची रोकड सापडली.
परशुराम पुरिया असे या सावकाराचे नाव असून, गणेश कॉलनीमधील त्याच्या घरामध्ये त्याने मोठया प्रमाणावर रोख रक्कम ठेवल्याची निवडणूक अधिका-यांना खात्रीलायक माहिती मिळाली होती.
त्या आधारावर निवडणूक अधिका-यांनी पहाटे त्याच्या घरावर धाड टाकून शोध सुरु केला असता कपाट आणि पेटयांमध्ये नऊ कोटीची रोकड सापडली. या भागामध्ये चोर बाबुलाल म्हणून हा सावकार ओळखला जातो. गणेश कॉलनीमध्ये त्याची तीन घरे आहेत. निवडणूक अधिका-यांनी रीतसर सर्च वॉरंट मिळवून ही धाड टाकली.
रोख रक्कमेबरोबर फिक्स डिपॉझिटच्या पावत्या, सोन्याची बिस्कीटे, वेगवेगळया जमीन व्यवहाराची कागदपत्रे आणि चेक सापडले. हा सावकार राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना व्याजावर पैसे देत होता असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये एका राजकीय पक्षाने पैसे परत केल्याचा चेकही सापडला.