किरण बेदी यांना भाजपचे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याबाबत ट्विटरवर केलेले ट्विट आपण केलेच नाही, अशी भूमिका नितिन गडकरी यांनी घेतली आहे.
नवी दिल्ली- किरण बेदी यांना भाजपचे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याबाबत ट्विटरवर केलेले ट्विट आपण केलेच नाही, अशी भूमिका भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी घेतली आहे. सदर ट्विट बनावट खात्यावरुन केली असून त्याच्याशी मला काही घेणे- देणे नाही अशी प्रतिक्रीया गडकरी यांनी दिली.
दिल्लीत होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, असे ट्विट भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे.
गडकरींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी गडकरी यांच्या या व्यक्तव्याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. तर, काही भाजप नेत्यांनी गडकरींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, स्वत: किरण बेदी यांनी मात्र या वृत्ताचे कोणतेही खंडन केलेले नाही. मुख्यमंत्रीपदाची उमेदवार अशी ब-याच दिवसांपासून चर्चा आहे, मात्र आजच्या तारखेला ही फक्त एक बातमी आहे. यापेक्षा आपण जास्त बोलणार नाही, असे बेदी यांनी सांगितले. येणा-या आगामी काळात काहीही होऊ शकते, येणारा काळच काय ते ठरवेल, असे त्या म्हणाल्या.
मात्र असे झाले तर एकेकाळी एका मंचावरुन आंदोलन करणारे केजरीवाल आणि बेदी यांच्यात द्वंद्वयुद्ध होण्याची शक्यता आहे. किरण बेदी या कट्टर मोदी समर्थक आहेत.