दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
नवी दिल्ली- यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. किरण बेदींच्या रुपाने दिल्लीत भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणा-या कृष्णनगर मतदारसंघातून किरण बेदींचा धक्कादायक पराभव झाला आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार एस.के. बग्गा यांनी दोन हजार २७७ मतांनी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदींचा पराभव केला.
कृष्णनगर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. १९९३ नंतर भाजपाचे नेते हर्षवर्धन सलग पाच वेळा या मतदासंघातून निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत या मतदासंघावर वर्चस्व कायम राखण्यात बेदींना अपयश आले आणि आपच्या बग्गा यांनी बेदींचा धक्कादायक पराभव करत आपचा झेंडा या बालेकिल्ल्यावर फडकवला.